Wednesday, 7 May 2014

स्वत: ला बदलताना....
     पुस्तक वाचून जसे पोहता येत नाही, तसे पुस्तक वाचून जीवनात यशस्वी होता येत

 नाही! पुस्तके आपल्यासमोर फक्त दिशादर्शक यंत्रासारखी असतात. जो आपल्या आवाक्यात आहे, फक्त

तोच भाग घ्यायचा. कोणीही कॉपी करुन यशस्वी होत नाही. यशस्वी पुरुषांची चरित्रे आपल्याला प्रेरणा देऊ

शकतात  पण त्यातूनही त्यांनी परिस्थितीला भावनिकरित्या कसे हाताळले, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
   बाजारात अश्या प्रेरणादायी पुस्तकांचे पेव फुटले आहेत. प्रकाशकसुद्धा 'यशस्वी व्हा','मजेत जगा','गोल्स', अशा प्रकारची पुस्तके भरपूर प्रमाणात प्रकाशित करत आहेत. त्यातली अनेक पुस्तके चांगली आहेत, याबद्दल दुमत नाही. पण स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट आपल्या मनाला बजावून सांगावी लागते ती म्हणजे बदल आपोआप घडत नाहीत. त्याकरीता सतत शिकत राहावे लागते. आपल्या दिवसभरातील घटनांचा आढावा घेऊन हातून घडलेल्या चुकांची स्वत:शी कबुली द्यावी लागते. 'ही चूक मी दुरुस्त करीन', असे निर्धाराने मनाला सांगावे लागते.
    बदल घडवून आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वत:च्या शक्तीस्थानांचे आणि मर्यादांचे भान ठेवत स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा निश्चय करणे. बाहेरच्या  परिस्थितीतील कोणते घटक आपल्या नियंत्रणाखाली असतात आणि कोणते घटक आपल्या नियंत्रणात नसतात हे मनात घोळवून ठेवावे लागते.
    स्वत:मध्ये सकारात्मक बदल करीत यशस्वी होणे अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. काही आपणच केलेले, काही इतरांनी उभे केलेले तर काही परिस्थितीमुळे निर्माण झालेले. 'भरगच्च भरलेली मनाची पाटी' हा सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा काम करावे लागेल. अनेक वेळा आपले जुने अनुभव, संस्कार, विचारसरणी, विचार करण्याची वृत्ती, आपल्या काही वारंवार घोटून घोटून गिरवलेल्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलेल्या आपल्या सवयी मनाच्या पाटीवर कोरलेल्या असतात. त्या पाटीवर नवे काही लिहायला जागाच नसते. आपल्या मनात काही सामाजिक, नैतिक गृहीतके असतात ती विचारांच्या पार्श्वभूमीवर आपोआप वाजत राहतात. त्यामुळे मन नवीन काही करण्यासाठी धजावतच नाही. या पाटीवर जे काही लिहिलंय ते पुन्हा एकदा तपासून पहावं लागतं.
    प्रत्येक गोष्टीला आपले आपण प्रश्न विचारायचे,' हे विचार माझी प्रगती करतील का?', की 'आहे त्या स्थितीतच ठेवतील?', ' या सवयी मला घातक आहेत का पूरक?' जर उत्तर नकारात्मक असेल तर त्या गोष्टी पाटीवरून पुसून टाकाव्यात आणि जोपर्यंत हा विचारांचा गजबजाट पुसला जात नाही तोपर्यंत काही खरे नाही.
    थोडक्यात म्हणजे, चांगले आहे ते जपून ठेवायचे आणि बाकीचे काढून टाकायचे. मनात साचलेल्या अनेक गोष्टी स्वच्छ केल्याशिवाय प्रगती होत नाही आणि प्रगती नेहमी आतून व्हायला हवी आणि ती सारखी सारखी करत राहणं गरजेचं असतं.  

No comments:

Post a Comment