Saturday, 17 May 2014

मतदार सुज्ञ झाल्यामुळेच 'अच्छे दिन आए है !'


   ३० वर्षांपूर्वी निर्माण झालेली राजकीय अवस्था या वेळच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निर्माण झाली असून नशिबाचे चक्र या वेळी भाजपच्या बाजूने फिरले आहे. १९८४ मध्ये केवळ दोन जागा पटकावणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभेत निर्णायक बहुमत प्राप्त झाले आहे. गेल्या २५ वर्षांत देशात एकाच राजकीय पक्षाचे सरकार स्थापन झालेले नव्हते. महाराष्ट्रात मनसे हाच 'आप'चा 'बाप' असल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला 'आप'पेक्षा कमी मते मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी साफ झिडकारले. मोदी लाटेत देशभरातील दिग्गज उमेदवारांचे पानिपत झाले. त्यातच मनसेही महाराष्ट्रात वाहून गेली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी करून सत्तास्थापनेच्या हालचाली करण्याच्या संभाव्य चाळ्यांना सूज्ञ मतदारांनीच चाप लावला आहे. तिसऱ्या आघाडीतील तृणमूल आणि अण्णाद्रमुक यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाला डोके वर काढण्याची संधी त्या त्या राज्यातील मतदारांनी दिली नाही.
     मतदारांना गृहीत धरणाऱ्या छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव गावित, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नीलेश राणे या मातब्बर नेत्यांच्या गुर्मीस या निवडणुकीत चपराक बसली. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवास विविध घोटाळे, भ्रष्टाचारांचे आरोप, महागाई, निष्क्रियता ही कारणे मुख्यत: जबाबदार ठरली आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे मौन आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या अभावामुळे सरकारची वाईट प्रतिमा तयार झाली. राहुल गांधी यांना ताळय़ावर आणू न शकणारी मनमोहन सिंग यांची असहायता ए राजा, सुरेश कलमाडी यांनाही मोकळे रान देत गेली आणि त्यातील प्रत्येक गैरव्यवहारातून पक्षाच्या पराजयाचे एके क बीज पेरले जाऊ लागले. परंतु याची कोणतीही जाणीव पक्षनेतृत्वास नव्हती. त्यामुळे आर्थिक असो वा राजकीय. काँग्रेस सरकार प्रत्येक आघाडीवर अधिकाधिक आणि उत्तरोत्तर अपयशी ठरत गेले. आज अखेर ते गेलेच.
     बाकी या निवडणुकीचा सरळ अर्थ आहे तो काम करा अथवा घरी जा, हा. तरुण मतदारांना रस आहे तो सकारात्मक काही घडण्यात. आपण ते घडवू असे मोदी यांचे वचन होते आणि त्यांची गुजरातमधील कामगिरी त्या वचनाचा आधार होती. त्यामुळे मतदारांनी त्यांना एकहाती कारभार करण्याइतके मताधिक्य दिले. सत्तासातत्यामुळे येणाऱ्या सुस्तीत मश्गूल राहून जनतेच्या आशा-आकांक्षांकडे पूर्णपणे कानाडोळा करणारी काँग्रेस आणि तिचे सुमार समर्थक यांच्यावरील संताप मतदारांनी या निवडणुकीत खणखणीतपणे व्यक्त केला असून जनरोषाचे हे रौद्ररूप अभूतपूर्वच म्हणावे लागेल.


No comments:

Post a Comment