Monday, 16 June 2014

Thursday, 12 June 2014

व्हिडिओ: ...असे वाहून गेले 'ते' २४ विद्यार्थी



   धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे व्यास नदीला अचानक आलेल्या पूरामध्ये २४ विद्यार्थी वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. गेल्या दोन दिवसांपासून वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. 
नदीमध्ये पाणी सोडताना काठावरील गावांमध्ये भोंगा वाजवून सूचना देण्याची पद्धत त्या परिसरात अवलंबिली जाते. रविवारी सायंकाळी पाणी सोडताना असा भोंगा वाजवला गेला नाही, असे गावक ऱ्यांचे म्हणणे आहे. असे वारंवार होते, असेही त्यांनी सांगितले आहे. हैदराबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील हे वीस विद्यार्थी कुलू येथे सहलीसाठी गेले होते. नदीकाठी गेल्यानंतर पाण्यात डुंबण्याची अनावर इच्छा होणे हे त्या वयाचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणायला हवे. हे तरुण पाण्यात तर गेलेच नाहीत, परंतु काठावर असतानाच काही मिनिटांतच नदीला प्रचंड प्रमाणात पाणी आले. पाणी वाढते आहे, हे कळल्यानंतर सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लागणारा अवधीही या तरुणांना मिळाला नाही आणि त्यात ते वाहून गेले. या भयावह प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला आहे...

Monday, 2 June 2014

प्रवास तेलंगण निर्मितीचा


वेगळ्या तेलंगणा राज्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करणाऱ्यांची आज अखेर स्वप्नपूर्ती झालीय. देशातले २९ वे राज्य म्हणून तेलंगणाची आज निर्मिती झाली आणि राज्यातल्या लोकांनी जल्लोषात त्याचं स्वागत केलं.

तेलंगण प्रांत  हा मूळचा निजामाच्या अधिपत्याखालचा प्रदेश. १९४८ मध्ये संस्थाने खालसा झाल्यानंतर हैदराबाद राज्याची स्थापना झाली. १९५३ मध्ये पोट्टी श्रीरामुलु यांच्या तेलुगु भाषिक राज्यासाठीच्या आंदोलनामुळे आणि उपोषणादरम्यान झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर १ नोव्हेंबर १९५३ रोजी तत्कालीन मद्रास प्रेसिडन्सीमधून आंध्र प्रदेश या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. १९५६ मध्ये हैदराबाद राज्याचे (तेलंगण प्रांत) आंध्र प्रदेशमध्ये विलिनीकरण झाले. मात्र याला दोन्ही प्रांतांतल्या आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दरीमुळे तेलंगणमधल्या नागरिकांचा विरोध होता.

तेलंगणला आंध्रमध्ये समाविष्ट करताना आंध्र आणि तेलंगण या दोन प्रांतात झालेल्या करारात तेलंगणचे हित अबाधित राखण्याचं आश्वासन मिळाल्यानं तेलंगणमधल्या नेत्यांची विलिनीकरणास मान्यता मिळाली. आंध्रकडून तेलंगणाला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे १९६९ मध्ये मारी चेन्ना रेड्डी यांच्या तेलंगण प्रजा समितीच्या नेतृत्त्वाखाली स्वतंत्र तेलंगणासाठीच्या मागणीला जोर आला. त्यावेळच्या निदर्शनांदरम्यान पोलिस गोळीबारात 350 जण ठार झाले . त्यानंतर १९९८ सालच्या निवडणुकीत ‘एक मत-दोन राज्य’, असं आश्वासन देत भाजपने स्वतंत्र राज्यास पाठिंबा दिला.
के. चंद्रशेखर राव यांनी २००१ साली तेलुगु देसम सोडून तेलंगण राष्ट्र समिती स्थापन केल्यानंतर स्वतंत्र तेलंगणच्या मागणीला पुन्हा जोर आला. २००४ मध्ये राव यांच्याशी हातमिळवणी करताना तेलंगणची मागणी मान्य करण्याचं काँग्रेसने आश्वासन दिलं होतं. काँग्रसने ते न पाळल्याने राव यांनी २००९ साली आमरण उपोषणाला बसले. त्यावेळी झालेल्या आंध्र आणि  तेलंगणमधल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्या. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली एका आयोगाची स्थापना केली. मात्र या आयोगाचा अहवाल टीआरएसनं फेटाळला. त्यानंतर ३० जुलै २०१३ रोजी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीस काँग्रेसच्या कार्यकारिणीकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऑक्टोबर २०१३ मध्ये आंध्र प्रदेशच्या विभाजनास केंद्राचीमान्यता मिळाली.

फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकसभेने तेलंगण विधेयक मंजूर केल्यानंतर विभाजनास विरोध करत आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री किरणकुमार रेड्डी यांनी बंड पुकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आज २ जून रोजी तेलंगणची देशातले २९वे राज्य म्हणून अस्तित्वात येणार असल्याची घोषणा झाली.




Monday, 26 May 2014

चार्ली चाप्लिनच्या काही चित्रविचित्र गोष्टी 

 वाचनामध्ये आलेल्या चार्ली चाप्लिनबद्दल काही चित्रविचित्र गोष्टी :-
पीटर अक्रॉइड यांनी प्रचंड संशोधन करून चार्लीचं संपूर्ण आयुष्य पुन्हा नव्यानं मांडलंय.
• चार्लीच्या खऱ्या आईसंदर्भात काही गंभीर शंका आहेत. आईनं जगण्यासाठी प्रसंगी देहविक्रयही केला असावा असं मानायला जागा आहे. तीही व्यसनी होती आणि चक्रमही होती. वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं. त्यामुळे चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा वसतिगृहांतच गेला.
• लहानपणी घर असं काही नव्हतंच. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठीही तो स्थानिक कलाकारांच्या मेळय़ांत पडेल ते काम करू लागला. त्यातल्याच एकाबरोबर १९१३ साली तो कार्यक्रमाच्या निमित्तानं इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला.
• पीटर सांगतात की चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता. एकेकटा राहायचा आणि सतत खिन्न असायचा.
• रॉबर्ट फ्लोरे नावाचा त्याचा सहायक दिग्दर्शक होता. त्यानं तर चार्लीचं वर्णन हुकूमशहा, एकाधिकारशाही गाजवणारा, हिंसक, क्रूर आणि जराही जवळ करू नये असा माणूस.. या शब्दांत केलंय.
• पीटर या चरित्राच्या निमित्तानं चार्लीच्या अनेक मुलांना भेटला. या सर्वाच्या मनात वडिलांविषयी एकच भावना होती, भीती. त्याचा एक मुलगा तर म्हणाला छोटय़ाशा रागासाठीही ते प्रचंड हिंसक व्हायचे. आम्हाला त्यांच्याकडे पाहायलाही भीती वाटायची.
• आणखी एक बाब म्हणजे आजचा दिवस कोणता.. म्हणजे सोमवार आहे की गुरुवार की आणखी कोणता.. हे कळून घ्यायला चार्लीला अजिबात आवडायचं नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर ते अत्यंत हिंसक होत. आणि दुसरं म्हणजे ते कधीही घडय़ाळ घालत नसत. त्याचाही भयंकर राग चार्लीच्या मनात होता.
• आई वेडी झाल्यापासून चार्लीच्या मनात स्त्रियांविषयी कमालीचा राग, संशय होता. त्यामुळे मिळेल त्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा छंदच त्याला लागला. त्यातली गंभीर बाब ही की चार्लीला बरोब्बर १५ वर्षांच्या मुलीच आवडायच्या. त्याबाबत तो इतका आग्रही असायचा की १६ वर्षांच्या होऊन त्यांच्याशी लग्न कसं करता येईल यासाठी तो वाटेल ते करायचा. त्यातल्या अनेकींशी त्यानं लग्न केली.
• त्यातल्या अनेक जणींनी पुढे घटस्फोट घेतले. त्या घटस्फोट प्रकरणांचा अभ्यास पीटरनं केला. त्याला आढळलं की यातल्या बऱ्याचशा घटस्फोटांत तरुणींची एकच तक्रार आहे. ती म्हणजे लग्न झाल्यावर चार्लीनं आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.. तो नव्या मुलींना शोधत राहिला.
• त्याची शेवटची पत्नी उना ओनील ही त्याच्यापेक्षा ३६ वर्षांनी लहान होती. म्हणजे लग्नाच्या वेळी चार्ली ५४ वर्षांचा तर ती १८ वर्षांची होती. ती विख्यात युजिन ओनील यांची मुलगी.
• सिटी लाइट या त्याच्या गाजलेल्या सिनेमात त्यानं एक दृश्य तब्बल ३४२ वेळा चित्रित केलं. दृश्य काय? तर त्यातल्या लिटिल ट्रॅम्पला एक अंध फुलविक्रेती फुलांचा गुच्छ देते, इतकंच.
• त्याचं मरणही सरळ नव्हतं. त्याची शवपेटिकाच चोरली गेली. चोरटय़ांना वाटलं तिच्या बदल्यात बक्कळ पैसे कमावता येतील. म्हणून त्यांनी चार्लीची एक पत्नी पॉलेट गोडार्ड..द गोल्ड रश या सिनेमातली नायिका.. हिला फोन करून सांगितलं..आम्ही चार्लीचं पार्थिव असलेली शवपेटी चोरलेली आहे. पॉलेट फक्त इतकंच म्हणाली.. बरं मग. आणि तिनं फोन ठेवला.

   या सगळ्या गोष्टी ऐकल्या की, ‘चार्ली चाप्लिनबद्दल सांगणारं नवं संशोधन लक्षात ठेवायचं की आजही जगण्याचं बळ देणारे त्याचे सिनेमे? ’कलाकाराचं काम पाहायचं की खासगी जीवन? ‘हा प्रश्न प्रत्येकालाच पडेल.

Saturday, 17 May 2014

मतदार सुज्ञ झाल्यामुळेच 'अच्छे दिन आए है !'


   ३० वर्षांपूर्वी निर्माण झालेली राजकीय अवस्था या वेळच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निर्माण झाली असून नशिबाचे चक्र या वेळी भाजपच्या बाजूने फिरले आहे. १९८४ मध्ये केवळ दोन जागा पटकावणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभेत निर्णायक बहुमत प्राप्त झाले आहे. गेल्या २५ वर्षांत देशात एकाच राजकीय पक्षाचे सरकार स्थापन झालेले नव्हते. महाराष्ट्रात मनसे हाच 'आप'चा 'बाप' असल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला 'आप'पेक्षा कमी मते मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी साफ झिडकारले. मोदी लाटेत देशभरातील दिग्गज उमेदवारांचे पानिपत झाले. त्यातच मनसेही महाराष्ट्रात वाहून गेली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी करून सत्तास्थापनेच्या हालचाली करण्याच्या संभाव्य चाळ्यांना सूज्ञ मतदारांनीच चाप लावला आहे. तिसऱ्या आघाडीतील तृणमूल आणि अण्णाद्रमुक यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाला डोके वर काढण्याची संधी त्या त्या राज्यातील मतदारांनी दिली नाही.
     मतदारांना गृहीत धरणाऱ्या छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव गावित, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नीलेश राणे या मातब्बर नेत्यांच्या गुर्मीस या निवडणुकीत चपराक बसली. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवास विविध घोटाळे, भ्रष्टाचारांचे आरोप, महागाई, निष्क्रियता ही कारणे मुख्यत: जबाबदार ठरली आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे मौन आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या अभावामुळे सरकारची वाईट प्रतिमा तयार झाली. राहुल गांधी यांना ताळय़ावर आणू न शकणारी मनमोहन सिंग यांची असहायता ए राजा, सुरेश कलमाडी यांनाही मोकळे रान देत गेली आणि त्यातील प्रत्येक गैरव्यवहारातून पक्षाच्या पराजयाचे एके क बीज पेरले जाऊ लागले. परंतु याची कोणतीही जाणीव पक्षनेतृत्वास नव्हती. त्यामुळे आर्थिक असो वा राजकीय. काँग्रेस सरकार प्रत्येक आघाडीवर अधिकाधिक आणि उत्तरोत्तर अपयशी ठरत गेले. आज अखेर ते गेलेच.
     बाकी या निवडणुकीचा सरळ अर्थ आहे तो काम करा अथवा घरी जा, हा. तरुण मतदारांना रस आहे तो सकारात्मक काही घडण्यात. आपण ते घडवू असे मोदी यांचे वचन होते आणि त्यांची गुजरातमधील कामगिरी त्या वचनाचा आधार होती. त्यामुळे मतदारांनी त्यांना एकहाती कारभार करण्याइतके मताधिक्य दिले. सत्तासातत्यामुळे येणाऱ्या सुस्तीत मश्गूल राहून जनतेच्या आशा-आकांक्षांकडे पूर्णपणे कानाडोळा करणारी काँग्रेस आणि तिचे सुमार समर्थक यांच्यावरील संताप मतदारांनी या निवडणुकीत खणखणीतपणे व्यक्त केला असून जनरोषाचे हे रौद्ररूप अभूतपूर्वच म्हणावे लागेल.


Wednesday, 7 May 2014

स्वत: ला बदलताना....
     पुस्तक वाचून जसे पोहता येत नाही, तसे पुस्तक वाचून जीवनात यशस्वी होता येत

 नाही! पुस्तके आपल्यासमोर फक्त दिशादर्शक यंत्रासारखी असतात. जो आपल्या आवाक्यात आहे, फक्त

तोच भाग घ्यायचा. कोणीही कॉपी करुन यशस्वी होत नाही. यशस्वी पुरुषांची चरित्रे आपल्याला प्रेरणा देऊ

शकतात  पण त्यातूनही त्यांनी परिस्थितीला भावनिकरित्या कसे हाताळले, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
   बाजारात अश्या प्रेरणादायी पुस्तकांचे पेव फुटले आहेत. प्रकाशकसुद्धा 'यशस्वी व्हा','मजेत जगा','गोल्स', अशा प्रकारची पुस्तके भरपूर प्रमाणात प्रकाशित करत आहेत. त्यातली अनेक पुस्तके चांगली आहेत, याबद्दल दुमत नाही. पण स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट आपल्या मनाला बजावून सांगावी लागते ती म्हणजे बदल आपोआप घडत नाहीत. त्याकरीता सतत शिकत राहावे लागते. आपल्या दिवसभरातील घटनांचा आढावा घेऊन हातून घडलेल्या चुकांची स्वत:शी कबुली द्यावी लागते. 'ही चूक मी दुरुस्त करीन', असे निर्धाराने मनाला सांगावे लागते.
    बदल घडवून आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वत:च्या शक्तीस्थानांचे आणि मर्यादांचे भान ठेवत स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा निश्चय करणे. बाहेरच्या  परिस्थितीतील कोणते घटक आपल्या नियंत्रणाखाली असतात आणि कोणते घटक आपल्या नियंत्रणात नसतात हे मनात घोळवून ठेवावे लागते.
    स्वत:मध्ये सकारात्मक बदल करीत यशस्वी होणे अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. काही आपणच केलेले, काही इतरांनी उभे केलेले तर काही परिस्थितीमुळे निर्माण झालेले. 'भरगच्च भरलेली मनाची पाटी' हा सर्वात महत्त्वाचा अडथळा आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा काम करावे लागेल. अनेक वेळा आपले जुने अनुभव, संस्कार, विचारसरणी, विचार करण्याची वृत्ती, आपल्या काही वारंवार घोटून घोटून गिरवलेल्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलेल्या आपल्या सवयी मनाच्या पाटीवर कोरलेल्या असतात. त्या पाटीवर नवे काही लिहायला जागाच नसते. आपल्या मनात काही सामाजिक, नैतिक गृहीतके असतात ती विचारांच्या पार्श्वभूमीवर आपोआप वाजत राहतात. त्यामुळे मन नवीन काही करण्यासाठी धजावतच नाही. या पाटीवर जे काही लिहिलंय ते पुन्हा एकदा तपासून पहावं लागतं.
    प्रत्येक गोष्टीला आपले आपण प्रश्न विचारायचे,' हे विचार माझी प्रगती करतील का?', की 'आहे त्या स्थितीतच ठेवतील?', ' या सवयी मला घातक आहेत का पूरक?' जर उत्तर नकारात्मक असेल तर त्या गोष्टी पाटीवरून पुसून टाकाव्यात आणि जोपर्यंत हा विचारांचा गजबजाट पुसला जात नाही तोपर्यंत काही खरे नाही.
    थोडक्यात म्हणजे, चांगले आहे ते जपून ठेवायचे आणि बाकीचे काढून टाकायचे. मनात साचलेल्या अनेक गोष्टी स्वच्छ केल्याशिवाय प्रगती होत नाही आणि प्रगती नेहमी आतून व्हायला हवी आणि ती सारखी सारखी करत राहणं गरजेचं असतं.