चार्ली चाप्लिनच्या काही चित्रविचित्र गोष्टी
वाचनामध्ये आलेल्या चार्ली चाप्लिनबद्दल काही चित्रविचित्र गोष्टी :-
पीटर अक्रॉइड यांनी प्रचंड संशोधन करून चार्लीचं संपूर्ण आयुष्य पुन्हा
नव्यानं मांडलंय.
• चार्लीच्या खऱ्या
आईसंदर्भात काही गंभीर शंका आहेत. आईनं जगण्यासाठी
प्रसंगी देहविक्रयही केला असावा असं मानायला जागा आहे. तीही व्यसनी होती आणि
चक्रमही होती. वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं.
त्यामुळे चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा वसतिगृहांतच
गेला.
• लहानपणी घर असं
काही नव्हतंच. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठीही तो स्थानिक
कलाकारांच्या मेळय़ांत पडेल ते काम करू लागला. त्यातल्याच एकाबरोबर १९१३ साली तो कार्यक्रमाच्या
निमित्तानं इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला.
• पीटर सांगतात की
चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय
असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता. एकेकटा राहायचा आणि सतत खिन्न
असायचा.
• रॉबर्ट फ्लोरे
नावाचा त्याचा सहायक दिग्दर्शक होता. त्यानं तर चार्लीचं वर्णन हुकूमशहा, एकाधिकारशाही
गाजवणारा, हिंसक, क्रूर आणि जराही जवळ करू नये असा माणूस.. या
शब्दांत केलंय.
• पीटर या चरित्राच्या
निमित्तानं चार्लीच्या अनेक मुलांना भेटला. या सर्वाच्या मनात वडिलांविषयी एकच
भावना होती, भीती. त्याचा एक मुलगा
तर म्हणाला छोटय़ाशा रागासाठीही ते प्रचंड हिंसक व्हायचे. आम्हाला त्यांच्याकडे
पाहायलाही भीती वाटायची.
• आणखी एक बाब म्हणजे
आजचा दिवस कोणता.. म्हणजे सोमवार आहे की गुरुवार की आणखी कोणता.. हे कळून घ्यायला
चार्लीला अजिबात आवडायचं नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर ते अत्यंत हिंसक होत. आणि
दुसरं म्हणजे ते कधीही घडय़ाळ घालत नसत. त्याचाही भयंकर राग चार्लीच्या मनात होता.
• आई वेडी
झाल्यापासून चार्लीच्या मनात स्त्रियांविषयी कमालीचा राग, संशय होता.
त्यामुळे मिळेल त्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा छंदच त्याला लागला. त्यातली गंभीर बाब
ही की चार्लीला बरोब्बर १५ वर्षांच्या मुलीच आवडायच्या. त्याबाबत तो इतका आग्रही
असायचा की १६ वर्षांच्या होऊन त्यांच्याशी लग्न कसं करता येईल यासाठी तो वाटेल ते
करायचा. त्यातल्या अनेकींशी त्यानं लग्न केली.
• त्यातल्या अनेक
जणींनी पुढे घटस्फोट घेतले. त्या घटस्फोट प्रकरणांचा अभ्यास पीटरनं केला. त्याला
आढळलं की यातल्या बऱ्याचशा घटस्फोटांत तरुणींची एकच तक्रार आहे. ती म्हणजे लग्न
झाल्यावर चार्लीनं आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.. तो नव्या मुलींना शोधत
राहिला.
• त्याची शेवटची
पत्नी उना ओनील ही त्याच्यापेक्षा ३६ वर्षांनी लहान होती. म्हणजे लग्नाच्या वेळी
चार्ली ५४ वर्षांचा तर ती १८ वर्षांची होती. ती विख्यात युजिन ओनील यांची मुलगी.
• सिटी लाइट या
त्याच्या गाजलेल्या सिनेमात त्यानं एक दृश्य तब्बल ३४२ वेळा चित्रित केलं. दृश्य
काय? तर त्यातल्या लिटिल ट्रॅम्पला एक अंध फुलविक्रेती फुलांचा
गुच्छ देते, इतकंच.
• त्याचं मरणही सरळ
नव्हतं. त्याची शवपेटिकाच
चोरली गेली. चोरटय़ांना वाटलं तिच्या बदल्यात बक्कळ पैसे कमावता येतील. म्हणून
त्यांनी चार्लीची एक पत्नी पॉलेट गोडार्ड..द गोल्ड रश या सिनेमातली नायिका.. हिला
फोन करून सांगितलं..आम्ही चार्लीचं पार्थिव असलेली शवपेटी चोरलेली आहे. पॉलेट फक्त
इतकंच म्हणाली.. बरं मग. आणि तिनं फोन ठेवला.
या सगळ्या गोष्टी
ऐकल्या की, ‘चार्ली चाप्लिनबद्दल सांगणारं
नवं संशोधन लक्षात ठेवायचं की आजही जगण्याचं बळ देणारे त्याचे सिनेमे? ’कलाकाराचं काम
पाहायचं की खासगी जीवन? ‘हा प्रश्न प्रत्येकालाच पडेल.
.jpg)
.jpg)







